Chairman's Message
तेली समाजातील थोर संत “संत जगनाडे महाराज” यांना वंदन करून,” तेली सेवा समाज मुंबई “ चे माजी अध्यक्ष व “श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित” चे संस्थापक/अध्यक्ष नामदेव विठ्ठल कांदळगावकर व त्यांचे सर्व सहकारी यांना अध्यक्ष दिलीप दशरथ केळंबेकर यांचे विनम्र अभिवादन. पतसंस्थेचा ५२ वा वार्षिक अहवाल आपल्या हाती देताना आनंद होत आहे.
सन २०१५-२०१६ हे “सुवर्णमहोत्सवी वर्ष” आपण मोठ्या उत्साहाने साजरे केले.सभासद व त्यांच्या कुटुंबियांचा “सहकार कुटुंब मेळावा” व सहकार प्रशिक्षण कार्यक्रम आपण दिनांक १७ एप्रिल २०१६ रोजी श्रमिक जिमखाना मुंबई ४०००११ येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. याच कार्यक्रमात “तेली समाज भवन” करीता समाज भवन स्मरणिका २०१६”चे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानिमित्त पतपेढीच्या सर्व माजी व आजी संचालकांचा,ठेवीदारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी मुंबई बँक अध्यक्ष मा.श्री.प्रविण दरेकर, सन्मां.श्री.दत्ताराम चाळके (अध्यक्ष,अपना सहकारी बँक),आमदार श्री.सुनील शिंदे, सन्मां.विलास त्रिंबककर, श्री.सतिश वैरागी, श्री.भगवान सातार्डेकर (अध्यक्ष-तेली सेवा समाज,मुंबई) श्री.शिवाजी झगडे (माजी अध्यक्ष- श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित),सौ. रुपाली चांदोस्कर (अध्यक्ष-महिला मंडळ,तेली सेवा समाज,मुंबई) श्री. शरद चव्हाण (भा.ज.पा.- प्रदेश कार्यकारणी सदस्य),श्री.विठ्ठलराव भोसले (संचालक मुंबई बँक), श्री.जनार्दन गवाणकर (अध्यक्ष-संताजी उत्साही मंडळ),श्री. प्रकाश डिचोलकर (कार्याध्यक्ष- तेली सेवा समाज) आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमात संस्थेचे जेष्ठ सदस्य व थोर समाज सेवक श्री.मनोहर परुळेकर आणि जेष्ठ समाजसेवक अॅड.श्री.नारायण (नाना) पवार ज्यांनी ५० वर्षे कोर्टात वकिली व्यवसाय केला,त्यांचा सन्मान करून त्यांना मानपत्र देण्यात आले.सदर प्रसंगी सहकार प्रशिक्षण कार्यक्रमात श्री.रतिकांत पिंगळे (सी.ए.) यांनी सभासदांना मार्गदर्शन केले.तद्प्रसंगी कार्यक्रमास १२०० हून अधिक सभासद व त्यांचे कुटुंबीय,समाज बांधव उपस्थित होते.सदर प्रसंगी समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर,जेष्ठ नागरिक विविध सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद! सदर प्रसंगी करमणूक म्हणून “ऑन लाईन गुदगुल्या” हा मराठी सिने-नाट्य कलाकारांचा धम्माल कार्यक्रम सादर झाला.कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. जनार्दन गवाणकर केले व श्री.किशोर रसाळ यांनी संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी पार पाडली.
दिनांक १ मे,२०१६ रोजी “गोष्ट तशी गमतीची” ह्या नाटकाचा प्रयोग यशवंत नाट्य मंदिर येथे झाला.या माध्यमातून पतपेढीच्या सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाटकाची तिकिटे घेऊन समाज भवन उभारणी निधीसाठी सहकार्य केल्याबादाल सर्वांना धन्यवाद! “समाज भवन २०१६” साठी जाहिरात,शुभेच्छा देण्यासाठी आर्थिक योगदान दिल्याबद्दल सर्व मान्यवर सभासद व जाहिरात देणगीदारांना शतशः धन्यवाद! पतसंस्थेने संचालक व कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेऊन मोलाचे सहकार्य दिले त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत.
संस्थापक सदस्य यांच्या स्मृती प्रित्यर्थ देणगी उभारून करून समाजभवन उभारण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे भाग्य आम्हा संचालकांना मिळाले. त्याबद्दल तेली सेवा समाजाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद! दिनांक १८ मार्च,२०१७ रोजी “तेली समाज भवन सिंधुदुर्ग” भवनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात मु.वेताळ-बांबार्डे,कुडाळ येथे पार पडला.त्यासाठी तेली सेवा समाज,मुंबई या संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा!
पतसंस्थेने दिनांक १ जून,२०१६ रोजी भांडूप शाखा सुरु केली. सध्या भांडूप शाखेत ३४९ सभासद झाले आहेत. सर्व सभासदांना विनंती करतो की,त्यांनी लोअर परेल,मालाड,भांडूप व जोगेश्वरी शाखेत सभासद वाढविणे व पतसंस्थेचा कारभार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य लागणार आहे.प्रत्येक सभासदांचे आपल्या कुटुंबातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक सज्ञान व्यक्तीला,तसेच बृहन्मुंबईत कायम नोकरी अथवा वास्तव्य किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला सभासद करावे.
रिझर्व बँकेच्या आदेशानुसार दि ९ नोव्हेंबर २०१६ रोजी रु.५००/- व १०००/- च्या चलनी नोटांवर बंदी घोषित केली.
त्यानंतरच्या काळात सर्व सभासदांनी,कर्जदार,ठेवीदार यांनी संस्थेवर विश्वास व्यक्त केला व संस्थेबरोबरचे व्यवहार धनादेशाद्वारे केले.त्यामुळे कर्जदारांनी त्यांचे नियमित हफ्ते भरताना जे सहकार्य केले.त्यामुळे एन.पी.ए.५% पर्यंत टिकून राहिला. ठेवींमध्ये सुद्धा चांगली वाढ झाली.अहवाल सालात वसूल भागभांडवल रु.२ कोटी ४२ लाखांहून अधिक झाले. यात रु.४६ लाखांहून अधिक वाढ झाली. ३१ मार्च २०१७ पर्यंत ९०३३ सभासद आहेत.सभासद ठेवी रु.२० कोटी ४१ लाखांहून अधिक झाल्या. यात रु. ६ कोटी ३९ लाखांहून अधिक वाढ झाली. सभासद कर्ज रु.१७ कोटी ७६ लाखांहून अधिक असून मागील वर्षाच्या तुलनेत रु.५ कोटी ५० लाखांहून अधिक कर्ज दिली गेली. संस्थेची एकूण उलाढाल रु.२९ कोटी १४ लाखांहून अधिक झाली असून यात रु.७ कोटी ८७ लाखांहून अधिक वाढ झाली आहे.संस्थेला या वर्षी देखील वैधानिक लेखापरीक्षकांनी “अ” वर्ग दिला आहे.
सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करताना संस्थेच्या वतीने सभासदांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. भेटवस्तूचा मान्यवर सभासदांनी स्विकार केला त्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने धन्यवाद! संस्थेस भागभांडवल रु.२.५ कोटी वरून रु.३.५ कोटी वाढीस मंजुरी मिळाली.
सध्या संस्था आर.बी.आय.तसेच आयकर विभाग (भारत सरकार) व सहकार निबंधक यांच्या सुचनेनुसार कारभार करत आहे.वेळोवेळी त्यांची परिपत्रके येतात त्यानुसार कारभारात अमुलाग्र बदल स्विकारला आहे. ऑडीटचे निकष अतिशय कडक करण्यात येत आहेत. तरी सध्याच्या परिस्थितीत कार्य करताना सभासदांनी संस्थेला सहकार्य करावे.शक्यतो धनादेशाद्वारे व्यवहार करण्यात येत आहेत.शासनाच्या कॅशलेस व्यवहार पद्धतीचा अवलंब करावा लागला आहे.यास सभासद सहकार्य करीत आहेत.त्याबद्दल सभासदांना धन्यवाद.संचालक मंडळाने सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षासाठी भागधारक सभासदांना १२.५० लाभांश देण्याचे ठरविले आहे. यास वार्षिक सर्व साधरण सभेने मान्यता द्यावी.येणाऱ्या कालखंडात मुंबई विभागात ८ शाखांचे जाळे व रु.७५ कोटीहून अधिक ठेवी उभारणे तसेच ठाणे,पालघर,नवी मुंबई,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग या जिल्हामध्ये कार्यक्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न करणे,प्रत्येक तालुका पातळीवर शाखा उभारणे,मुंबई बाहेरील सभासदांसाठी “गृहसंकुल” उभारण्याचा प्रकल्प राबविणे अशा योजना आहेत.सभासदांच्या पाल्यांसाठी उच्चशिक्षणासाठी १०% अल्प व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.सभासदांना गृहबांधणी /घर खरेदी (स्थावरतारण कर्ज) यासाठी स्थावर मूल्यांकनाच्या ७५ टक्केपर्यंत,जास्तीत जास्त रु.५० लाखापर्यंत कर्ज दिले जाते.कर्ज परतफेडीचा कालावधी २० वर्षांपर्यंत आहे.सभासदांसाठी वैयक्तिक कर्ज रुपये १ लाखापर्यंत असून १४% व्याजदर आहे.तातडीचे कर्ज,व्यवसाय कर्ज,तीन चाकी वाहन कर्ज तसेच शैक्षणिक कर्ज,ठेव तारण कर्ज दिली जातात.सोनेतारण कर्ज एका तासात सोन्याच्या मूल्यांकनाच्या किमतींच्या ८५% रक्कमे एवढे रु.५ लाखापर्यंत कर्ज दिले जाते.
सध्या संस्थेत विविध ठेव योजना राबविल्या जातात.यात “मासिक ठेव प्राप्ती योजना” व “दामदुप्पट योजना” (७६ महिने जेष्ठ नागरिक सभासदांसाठी व ७८ महिने सर्व साधारण सभासदांसाठी), “अक्षय ठेव योजना” (३१ महिने १०.५०% व जेष्ठ नागरिकांना ११%) दराने ठेवी स्विकारत आहोत. प्रत्येक सभासदाने संस्थेत सलग पाच वर्षात किमान एक वर्षासाठी कमीत कमी रु.५०००/- किंवा त्यापेक्षा जास्त ठेव अथवा कर्ज घेणे बंधनकारक आहे.त्यामुळे सध्या सुरु असलेल्या ठेव योजनांचा लाभ सभासदांनी जरूर घ्यावा. सध्या १०० दिवस ७%,२०० दिवस ८%, २५० दिवस ९%, १५ महिने ११% मुदतीसाठी विशेष ठेव योजना राबविली जात आहे.या सर्व ठेवींवर जेष्ठ नागरिक सभासदांना ०.५०% अधिक व्याज दिले जाते.तरी जास्तीत जास्त ठेवी ठेवून सभासदांनी चांगल्या व्याजदराचा लाभ घ्यावा. सदर योजना मर्यादित कालावधीसाठी आहेत.
संस्थेच्या प्रगतीत आपणा सर्वांचे सहकार्य आतापर्यंत पतसंस्थेला जसे मिळत आले तसे भविष्यात मिळावे. हीच आई जगदंबेकडे प्रार्थना करतो.आपणास व आपल्या कुटुंबातील सर्वांना येणाऱ्या गणेशोत्सव,दसरा,दिवाळी व येणारे नवीन वर्ष सुख समृद्धी,भरभराटीचे उत्तम आरोग्याचे व दीर्घायुषी जावो.ही परमेश्वर चरणी प्रार्थना करून या निवेदनाद्वारे आपणाशी सुसंवाद साधता आला.काही चूकभूल कळत नकळत झाली असल्यास क्षमस्व!
पुनश्च एकदा आपणास धन्यवाद देऊन हे निवेदन इथेच संपवतो.
जय सहकार ! जय महाराष्ट्र ! जय संताजी !
श्री. दिलीप दशरथ केळंबेकर
अध्यक्ष
If you have any enquiry please click here Enquiry.
If you have a bank detail please click here If you have any enquiry please click here Enquiry.
If you have a bank detail please click here