रौप्य महोत्सवी वर्षी संस्थापक अध्यक्ष श्री.नामदेव वि.कांदळगांवकार (मुख्य प्रवर्तक) यांचे मनोगत
मागे वळून पाहता...
ही गोष्ट आहे एका छोट्या बैठकीची! त्यातून जन्मलेल्या विश्वेश्वर सहकारी पतपेढीची!!
१ जानेवारी १९६६ चा शुभदिवस,सकाळचे सात वाजले होते.एक छोटी बैठक भरली होती; ठिकाण होते लोअर परेल येथील खिमजी नागजी चाळ क्र.६, आणि खोली क्र.३६, हि छोटेखानी खोली म्हणजेच “तेली सेवा समाज” या संस्थेचे कार्यालय. आमंत्रित होते समाजातील निवडक कार्यकर्ते. विषय होता, एक पतपेढी स्थापन करण्याचा.खाजगी फंडांचा सुळसुळाट बंद करण्याचा.तळागळाच्या लोकांना आर्थिक हात पुढे करण्याचा.पठाणी व्याजाच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा.शक्य झाल्यास सामान्यांचा विकास करण्याचा.सहकाराचा सुगंध दरवळविण्याचा.
बैठक तशी पूर्व नियोजित होती.वेळही पूर्व नियोजित होती.कोणत्याही बैठकीची सकाळची सातची वेळ ही ऐकायला अगदी चमत्कारीक वाटते.ती सुद्धा कडाक्याच्या थंडीच्या मोसमात.विस्तीर्ण मुंबईच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांना ती आणखीनच अडचणीची.परंतु हि अवघड वेळ मुद्दामच निवडण्यात आली होती.त्यातून कार्यकर्त्यांची चिकाटी,कसोटी,अंगिकारलेल्या कामांची आत्मियता पहावयाची होती.त्यांची पारख घ्यायची होती. आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व कार्यकर्ते पुरेपूर कसोटीला उतरले.सर्व श्री. यशवंतराव हरी आडिवरेकर, दत्ताराम रामचंद्र राणे, मुकुंद सखाराम कामतेकर, रघुनाथ गोविंद राणे, वसंत सिताराम कुरळकर,अर्जुन भागोजी मटकर,शांताराम गोविंद किंजवडेकर,यशवंत शंकर पावसकर,धोंडू अर्जुन तळावडेकर व मी स्वतः ठरल्या वेळेपूर्वीच हजर झालो.नव वर्षाच्या उगवत्या सूर्याला साक्षीला ठेवून सहकाराची ज्योत प्रज्वलीत केली.ती सतत तेवत ठेवण्याची शपथ घेण्यात आली.त्या साठी वाटेल त्या खस्ता खाण्याची,पादत्राने झिजवण्याची तयारी झाली.श्री विश्वेश्वर सहकारी पतपेढी स्थापन करण्याचे ठरले.उपस्थितांनी आपली वर्गणी तेथेच चुकती केली.सभासद नोंदणीचा “श्री गणेशा” झाला.देवाचे नाव असलेली पतपेढी रजिस्टर करण्याच्या दिशेने पाऊले उचलली गेली.
ध्येयपूर्तीचा निश्चय झाला! कार्यकर्त्यांनी पायाला भिंगऱ्या बांधल्या!!सभासद जमविण्याच्या कामास सुरवात झाली.पतपेढी रजिस्टर करणे ह्या व अनुषंगाने येणाऱ्या इतर सर्व गोष्टींची पूर्तता करणे या कामी श्री.शरदराव शेंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले रजिस्ट्रेशनसाठी सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आली.१ फेब्रुवारी १९६६ रोजी १६६ सभासद व रु.२८८०/- भाग भांडवलनिशी पतपेढीच्या रजिस्ट्रेशनसाठी अर्ज केला. ६ मार्च १९६६ या शुभदिनी पतपेढी रजिस्टर झाली.”विश्वेश्वर कुटुंबाला” ६ मार्च हा ऐतिहासिक दिवस ठरला.जिद्द बाळगल्यास,योग्य दिशेने काम केल्यास,यश साध्य होणे कठीण नाही हे सिद्ध झाले.सभासद नोंदणी चालू होती. त्यानंतर सर्व श्री.भाई डिचोलकर,पांडुरंग पाटील,जगदीश चांदोस्कर,सदाशिव तेली इत्यादी अनेक कार्यकर्त्यांची भर पडली.उत्साह व्दिगुणीत झाला.नव्या जोमाने अधिक उत्साहाने पुन्हा कामास सुरुवात झाली.
सभासदांना बचत करण्यास उदयुक्त करणे आणि गरजेच्या वेळी कर्ज रूपाने मदत करणे, हे पतपेढीचे मुख्य उद्दिष्ट,बचत करण्याच्या कामास सुरवात झालेली होतीच,कर्ज मंजूर करण्याचे काम शिल्लक होते.म्हणजेच उत्पन्नाचे महत्वाचे अंग सुरु करणे बाकी होते.तेही तत्परतेने हाती घेण्याचे ठरले.कर्जासाठी अर्ज मागविण्यात आले.१० एप्रिल १९६६ रोजी प्रथमतः १४ सभासदांना प्रत्येकी २००/- प्रमाणे २,८००/-कर्ज मंजूर करण्यात आले.१२ एप्रिल १९६६ रोजी त्याचे वाटप करण्यात आले.अपेक्षापुर्ती दृष्टोतपत्तीस आली. सभासदांमध्ये विश्वास निर्माण झाला. नवीन सभासद आणणे, भागभांडवल उभारणे, कर्ज मंजूर करणे हि कामे नित्यनेमाची झाली. सभासद व कार्यकर्त्यांची कार्यालयात ये जा वाढली. कार्यालय सकाळ संध्याकाळ उघडू लागले. सुट्टी तर केव्हाच नाही. कार्यालय फुलून जाऊ लागले. चैतन्याचा झरा वाहू लागला.
सभासदांबरोबर गरजांची वाढ होऊ लागली,बचतीची नवीन योजनांची गरज निर्माण झाली.म्हणून कायम स्वरुपाची ठेव स्विकारण्याची योजना सुरु झाली.९ एप्रिल १९६७,सौ.जयश्री नामदेव कांदळगांवकर यांनी ५० रू.ची ठेव ठेवून मुदत ठेव खात्याचा शुभारंभ केला.त्या काळात ही ठेव आम्हास खरोखरच लाख मोलाची होती.
पतपेढीची आवक वाढली,कर्ज मागणीचे प्रमाणही वाढले.वेळप्रसंगी बँकेतून कर्ज घेऊनही सभासदांच्या गरजा भागवण्यात येत होत्या.भाग भांडवल व कर्ज यांची मर्यादा वाढविणे आणि बचतीची नवी दालने उपलब्ध करणे जरुरीचे भासले.सुरवातीचे रुपये ५०,०००/- चे भाग भांडवल सन १९७० मध्ये एक लाख,१९७१ मध्ये दोन लाख,१९७७ मध्ये पाच लाख,१९८० मध्ये दहा लाख,१९८७ मध्ये वीस लाख व १९९० मध्ये चाळीस लाखापर्यंत वाढविण्यात आले.भागभांडवलाची मर्यादा पूर्ण विचारांती टप्प्याप्प्यांने वाढविण्यात आली आहे.आज वसूल भाग भांडवलाने अठरा लाखाची मर्यादा ओलांडली आहे.
सुरवातीच्या वैयक्तिक कर्जाची मर्यादा फक्त रुपये ५००/- होती,ती सन १९७३ मध्ये १०००/-,१९७९ मध्ये २०००/-,१९८८ मध्ये ५,०००/- व १९९० मध्ये १०,०००/- पर्यंत वाढविण्यात आली.सभासदांच्या गरजा फक्त वैयक्तिक कर्जाने भागतात असे नाही.सभासदांचा विकास साधायचा असेल तर उत्पादक कार्यासाठी कर्ज देणे आवश्यक आहे.ह्याची उकल झाली म्हणूनच टँक्सी,रिक्षा तारण,छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगारात गुंतलेल्या व्यक्तीसाठी २५ ते ७० हजारांपर्यंत कर्ज देण्याच्या योजना आखण्यात आल्या. त्या कार्यान्वित करण्यात आल्या. आज विविध योजनांखाली दरमहा रु.३,००,०००/- च्या आसपास कर्ज दिले जाते आणि ते सुद्धा सभासदांच्या बचतीमधूनच.
सभासदांना बचतीची सवय लागणे,त्यांच्या गरजा भागतील इतपत कर्ज देणे व त्याची वेळेवर वसुली करणे ह्या तीन गोष्टी म्हणजे पतपेढीचा आत्मा आहे. जानेवारी १९८८ पासून आवर्त ठेव,दामदुप्पट ठेव व बचत खात्याच्या सुविधा सभासदांना उपलब्ध करून देण्यात आल्या. या सर्व योजनांना सभासद बंधूनी अपेक्षे पलिकडे उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी सभासद स्वतःच जागरूक आहेत.म्हणूनच गेल्या २५ वर्षात एकही कर्ज बुडीत काढण्याचा प्रसंग आलेला नाही,हे सांगण्यास आनंद वाटतो.
पतपेढीच्या या रथाचे घोडे चौखूर उधळतांना कधी ठेचाळले! अशा वेळी कार्यकर्ते भयभित झाले!! सामाजिक संस्था मध्ये जे होऊ नये ते झाले, असे सर्वांना वाटले. काही जणांना संस्थेशी असलेला सबंध नकोसा झाला.अशा वेळी संस्थेच्या नेतृत्वाची कसोटी लागली. झाल्या प्रकाराने ते नेतृत्व हतबल झाले नाही,तर नव्या जोमाने त्यांनी पाऊले उचलली.योग्य त्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करून झालेले प्रकार सर्व सभासदांपुढे ठेवले.त्यांनी अशा प्रकारची कायदेशीर कारवाई तर केलीच परंतू पुन्हा नको ते प्रकार होऊ नये या करीता संस्थेच्या कार्यवाहित योग्य बदल करून संस्थेला नवा जोम दिला. त्याचं फलित म्हणून की काय, आजचा हा सोन्याचा दिवस आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पाहिला.
अदयाप पर्यंत जे केले ते खूप केले,असे म्हणता येणार नाही परंतु भविष्य काळात मात्र तरुण पिढीला खुप काही करणे बाकी आहे.विदयुत वेगाने पुढे जाणाऱ्या जगात आपल्या पतपेढीला बरेच काही करता येण्यासारखे आहे.त्यासाठी कार्यकर्तेही प्रयत्नशील आहेत. छोटया मोठया उद्योजक सभासदांसाठी ‘दैनंदिन बचत’ ’सुमंगल बचत’ ‘विदयावर्धिनी बचत’ अशा बचतीच्या विविध योजना सुरु करण्याचा मानस आहे. नवीन कर्जाच्या योजना ओघाने आल्याच. माल तारण कर्ज योजना,हप्ते बंद खरेदी इ.कर्जाच्या योजनाही आखण्यात येणार आहेत.
आज श्री विश्वेश्वर हे ४,५०० हून अधिक सभासदांचे कुटुंब आहे.याला उज्वल भवितव्य आहे.सहकाराची ज्योत तेवत ठेवण्याची प्रत्येकाची भावना आहे.एकमेकांचे सुख दु:ख जाणून घेण्याची इच्छा आहे.समाज सुखी व संपन्न करण्याची जिद्द आहे.त्यातूनच आपला उत्कर्ष साधता येणार आहे.आपले जीवन सहकारमय बनविता येईल;तेव्हाच एक मोठी बैठक भरविता येईल व श्रमाचे सार्थक होईल.
(श्री.नामदेव विठ्ठल कांदळगावकर)
संस्थापक अध्यक्ष